…अखेर तारीख ठरली ! खडसेंचा ‘ह्या’ दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश होणार ?

9

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर खडसे राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार होते मात्र, प्रवेश होऊ शकला नव्हता. आता पुन्हा नवीन प्रवेशाची तारीख ठरली असल्याचं वृत्त टीव्ही ९ या वृत्तवाहिनीने दिलं आहे. येत्या २२ ऑक्टोबरला मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं कळतंय.

एकनाथ खडसेंच्या सोबत त्यांच्या कन्या जळगावच्या जिल्हा बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे ह्या सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश होईल. मात्र, महत्वाचं म्हणजे खडसेंच्या सूनबाई आणि खासदार रक्षा खडसे ह्या भाजप मध्येच राहणार आहेत.

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर पाठवण्यात येईल. इतकचं नाही तर त्यानंतर मंत्रिमंडळात खडसेंचा समावेश करण्यासाठी चर्चा सुरु आहे. शिवसेना-राष्ट्रवादी खात्यांची अदलाबदल करून एकनाथ खडसेंना कृषिमंत्री पद देण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. ह्याबद्दल अंतिम निर्णय उध्दव ठाकरे आणि शरद पवार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.