उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून, कलम 144 लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या प्रकरणात अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “उत्तर प्रदेशातील आई-बहिणींच्या सन्मानाला आणि स्वाभिमानाला धक्का पोहचवणाऱ्यांचा संपूर्णत: नाश निश्चित आहे. दोषींना असा दंड मिळेल की भविष्यात ते उदाहरण म्हणून ओळखलं जाईल. उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक आई-बहिणींच्या सुरक्षा आणि विकासासाठी वचनबद्ध आहे.” असं ट्विट करून योगी आदित्यनाथ यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.