मनसुख हिरेन संशयित मृत्यु प्रकरणाने राज्यातील राजकारणाला एक वेगळेच वळण प्राप्त झाले आहे. विरोधकांनी यावर आक्रमक भूमिका घेत याप्रकरणी नाव समोर आलेले क्राईम ब्राचचे अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. काल सभागृहात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आक्रमकपणे हा मुद्दा ऊपस्थित करत सचिन वाझेंच्या निलंबनाची मागणी केली. परिणामी सचिन वाझे यांची बदली करण्याचा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात अला आहे.
मनसुख हिरेन यांच्या पत्नीनेसुद्धा सचिन वाझे यांच्यावर मनसुख यांच्या हत्येचे आरोप केले आहे. विरोधकांनी दबाव आणल्यामुळे आजा विधानपरिषदेत निवेदन देत असतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंची क्राईम ब्रांचमधून बदली करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यात येणार असल्याचेसुद्धा सांगीतले.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली कार निर्जन अवस्थेत आढळून आली होती.या कारचे मालक मनसुख हिरेन यांनी अगोदरच कार चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांना चौकशीच्या नावाखाली छळले गेले असल्याचे त्यांनी स्वत: मुख्यमंत्री गृहमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात लिहीले आहे. तसेच सचिन वाझे यांचासुद्धा त्या पत्रात नाव आहे.
सचिन वाझे यांच्याविरोधात एवढे पुरावे असतांनासुद्धा त्यांना अटक न केली जाणे म्हणजे सरकार त्यांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच आम्ही वारंवार सरकारवर दबाव आणल्यामुळे त्यांनी सचिन वाझेंची बदली केली आहे. मात्र आम्ही निलंबनाची मागणी करतो आहे. मनसुख हिरेन यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही लढत राहू असेसुद्धा फडणवीस यावेळी म्हणाले.