परस्त्री मातेसमान मानलं जाणाऱ्या भारतभूमीत एखाद्या मुलीवर बलात्कार होतो. ती गप्प रहावी म्हणून तिची जीभ कापली जाते. तिच्या मनक्याला इजा पोहोचवली जाते. स्वतःच पूरुषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या बाईपणाची अक्षरशः लक्तरे टांगली जातात. आणि याच्याही पुढे जाऊन व्यवस्थेकडून तिला पद्धतशीर दहन केलं जातं. आणि आपण काय करतो..??
शारीरिक हिंसाचार पीडित/मृत व्यक्तीचे फोटो व्हायरल करणे, हा गुन्हा असूनही असे फोटो स्टेटसला टाकून नसलेलं दुःख,निषेध व्यक्त करतो. अन हे सगळं करताना मृत व्यक्तीलाही तिची काही प्रतिष्ठा आहे. हे सरळ, सरळ विसरून जातो नाही का ? आपण…
अशा कित्येक घटना समाजात घडत होत्या. घडत आहेत. आणि यापुढे त्या घडणार नाहीत याचीही काही चिन्हे दिसत नाहीत. यासगळ्याच कारण आहे मानसिकता. एखाद्या मुलीने कस रहावं. कसं वागावं. किंवा तिने काय करावं. याचे उपदेश देण्यापेक्षा ती क्रूर मानसिकता कशी बदलता येईल याचा विचार कधीच केला जात नाही. याच्या उलट या घटनेत राजकारण कसं आणता येईल. तिच्या धर्मावरून काही वाद निर्माण करता येऊ शकतात का ? यांसारख्या प्रश्नात गुंतून राहतात विशिष्ट माणसांचे विचार…
मुलीची अब्रू, इज्जत म्हणजे काय वाटतं या लोकांना.. ? स्वतःची ती क्षणिक राक्षसी भूक भागवण्यासाठी आपण एखाद्याच्या जीवाशी खेळतोय याचंही भान राहू नये ? यात कसला आलाय पुरुषार्थ ! या माणसांनी स्वतःला माणूस म्हणवून घेण्याचा हक्क तर केंव्हाच गमावलाय. आता मोर्चे निघतील. आंदोलने होतील. मेणबत्त्या लावल्या जातील. आणि कदाचित गुन्हेगारांना शिक्षाही दिली जाईल. पण, त्या मुलीचा गेलेला जीव. तिचं विस्कटलेलं बाईपण कोणत्याच व्यवस्थेला परत मिळवता येणार
निर्भया, प्रियांका, मनीषा ही तर फक्त काहीच नाव आहेत. इथं रोज असे अमानुष प्रकार घडतात; पण प्रतिष्ठा, मान, इज्जत या आभासी गोष्टींना घाबरून, लपवून ठेवलं जातं. अशा कित्येक मुठी झाकल्या गेल्या आहेत. अन्यायाच्या अंधारात…आणि मला माहिती आहे. जोवर लोकांची मानसिकता बदलत नाही; तोवर यातलं काहीच बदलणार नाहीय. आज ना उद्या या सगळ्यावर प्रकाश पडेल याच आशेवर जगत राहायचं आपण सगळ्यांनी. शेवटी श्वास कितीही महत्त्वाचा असला तरी आशेच्या जीवावरच श्वास सुरू असतो…
- – मेघना शिवाजी जाधव