राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय मंत्री व भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघडी सरकारवर टीका करताना म्हटलं होतं की, आम्ही सरकार पाडण्यासाठी कोणतेही प्रयत्न करणार नाही. हे अमर-अकबर-अंथोनीचे सरकार असून ते आपोआप पडेल असं दानवे यांनी म्हटले होते. त्याला प्रत्यूत्तर देताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दानवे यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या बदनामीचे त्यांचे प्रयत्न आम्ही हाणून पाडतो आणि कोरोना संकटातही राज्य प्रगतीपथावर नेतो, कारण – होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथोनी ! जेव्हा आम्ही तीन पक्ष जेव्ह एकत्र येतो तेव्हा आम्ही राज्य प्रगतीपथावर नेतो असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारच्या कृषी कायद्यांमुळे छोट्या शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्यानेच काँग्रेस या विधेयकांना विरोध करत असल्याचं ते म्हणाले होते. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरापूर्वी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन आमचं सरकार आल्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, अशी घोषणा केली होती. आता त्याचं सरकार आलं आहे, तर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भररपाई द्यावी,” अशी मागणी देखील दानवे यांनी केली होती.