“आत्ता तरी ते शक्य नाही” शाळा उघडण्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान

15

कोरोनाने जगभरात थैमान घातलं असताना आता शाळा कधी उघडणार हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळा उघडण्या बाबत मोठं विधान केलं आहे. अजित पवार म्हणाले की, “अनलॉकच्या प्रक्रियेदरम्यान आम्ही क्रमाक्रमाने सर्वकाही सुरु करणार आहोत. परंतु ते करत असताना कोरोनाची परिस्थिती लक्षात घेतली जाईल. शाळा कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जातोय. परंतु आत्ता तरी ते शक्य नाही”.

त्याचबरोबर पवारांनी शाळा उघडण्यास सध्या तरी असमर्थता दाखवली तसेच त्यांनी पुढील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “शेजारच्या राज्यांमध्ये शाळा सुरु करण्यात आल्या खऱ्या, मात्र तिथे विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठवायला घबरत आहेत. आपल्या मुलाला कोरोना झाला तर काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो. आम्हालाही मुलांच्या आरोग्याची काळजी आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत आम्ही शाळा सुरु करण्याचा निर्णय घेणार नाही. आम्ही दिवाळीनंतर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊ. त्यानंतरच शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेऊ”.

गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. हळूहळू दुकाने, मॉल, सिनेमा गृह तसेच सार्वजनिक सेवा सुरू होत आहेत. मात्र, शाळा इतक्यात सुरू होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याच्या भवितव्याच काय ? असा प्रश्न पालकांना पडल्याच दिसतंय.