भाजपचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काल मुंबईत दाखल झाले आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसार माध्यमातून चर्चिल्या जात होत्या. त्यातच ते आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याचे तर्क वितर्क लावले जात असून, येत्या काही दिवसात ते भाजपला सोडचिट्ठी देतील आणि राष्ट्रवादीत प्रवेश करतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
त्यातच आता, खडसेंच्या पक्ष प्रवेशावर केंद्रीय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील कमेंट केली आहे. आठवले बोलण्याच्या आपल्या वेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी खडासेंबाबत म्हटलं आहे की, ‘एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत. जायचं होतं, तर त्यांनी आधी जायला हवं होतं, ते मंत्री झाले असते. आता सगळं फुल्ल आहे. राष्ट्रवादीत जाण्यापेक्षा त्यांनी ‘रिपाइं’मध्ये यावं, आपण आपले सरकार आणू,’ अशी ऑफर त्यांनी खडसेंना दिली आहे.