तुमच्यासारखे बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतात काय? असा संतप्त सवाल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित करत, महसूल आणि बंदरे विकास अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापल्याच पाहायला मिळालं. महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे काल संध्याकाळी सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांच्यासह वेंगुर्ले रेडी बंदराची पाहणी करण्यासाठी गेले. मात्र, रेडी पोर्ट कंपनीचे अधिकारी वगळता महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचा एकही अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नव्हता त्यामुळे अब्दुल सत्तार भडकले. त्यांनी मेरिटाईम बोर्डाचे मुख्य अधिकारी सैनी यांना दूरध्वनी करून संपर्क साधला आणि चांगलेच धारेवर धरले.
स्वतः सरकारमधील मंञी येतो, तर माझे हे हाल तर तुम्ही काय जबाबदारी पार पाडणार? पाच दिवसांपूर्वी दौ-याचं नियोजन दिले होते. मग हे कसले ढिसाळ नियोजन? याची लेखी तक्रार मुख्यसचिवांना केली जाईल, असं महसूल आणि बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहेत. तुमच्यासारखा बेजबाबदार अधिकारी आम्हाला किराणा दुकानदार समजतो काय, अशा कडक शब्दांत अब्दुल सत्तार यांनी मेरिटाईम बोर्डाच्या अधिका-यांना दम भरला.