उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून सोमवारी महाराष्ट्रात सत्याग्रह करण्यात येणार आहेत. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष कायम राहील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
याबाबत बोलताना महसूलमंत्री थोरात म्हणाले की, भाजपशासीत राज्यात महिला सुरक्षित नाहीत. ‘बेटी बचाओ’चा नारा देणारे पंतप्रधान मोदी यावर गप्प आहेत. काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातील भाजपाच्या सरकारला जाब विचारण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी सत्याग्रह करणार आहे. राज्यातल्या सर्व जिल्हात हा सत्याग्रह केला जाणार आहे. आपण स्वतः मुंबई मध्ये सत्याग्रहात सहभागी होणार आहोत असे थोरात म्हणाले.
काँग्रेस खा.राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. उत्तर प्रदेश सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करत महाराष्ट्रासह देशभरात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व संताप व्यक्त केला आहे. शेवटी गांधी यांना पीडित कुटुंबाला भेटण्याची परवानगी दिली. हा सत्तेचा माज आहे. भाजपाचा हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे थोरात म्हणाले.