लॉकडाउनच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठका तसेच राज्यातील कामकाजा संबंधी बैठकांचा धडाका लावला होता. अजित पवार मुंबईतील ब्रीज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी थकवा व अंगात कणकण असल्याने ते होम क्वारंटाइन झाले होते. खबरदारी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणीही केली होती. ती निगेटिव्ह आली होती. त्यानंतरही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते घरीच होते. त्यांनी शासकीय बैठका व पक्षपातळीवरील कार्यक्रमही रद्द केले होते. मात्र, घरातून त्यांचे कार्यालयीन कामकाज सुरूच ठेवले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्रीमधून राज्याचा कारभार चालवत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र मंत्रालयात दररोज हजेरी लावत होते. तसेच विविध आढावा बैठक घेत होते. कोरोणाची लागण होऊ नये यासाठी त्यांनी काटेकोरपणे दक्षता बाळगली होती. तोंडावर कायमस्वरूपी मास्क, हात सातत्याने सेनिटाईज करणे आणि लोकांची तसेच अधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांशी बोलताना, वावरतांना काटेकोरपणे सोशल डिस्टसिंग पाळणे, अशी काळजी अजित पवार कटाक्षाने घेत होते. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.