अजूनही आठवते ती रात्र. त्या रात्रीची भयानक शांतता. तो दिवस अमावस्येचा होता. आम्ही घरातील सर्वजण आदल्या दिवशी अष्टविनायक दर्शनासाठी निघालो होतो. पहिल्या दिवशी आम्ही पुण्यात मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरचा चिंतामणी दोन गणपती करून संध्याकाळी सिद्धटेकचा सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालो होतो. जाता जाता सायंकाळ उलटुन गेली रात्रीचे आठ वाजले होते आम्हाला खूप भूकही लागली होती. रस्त्यात जेवणासाठी एकही हॉटेल दिसत नव्हते. शेवटी हॉटेल शोधत शोधत एक रस्त्याच्या कडेला ढाबा आम्हाला दिसला. तत्क्षणी आम्ही त्या ढाब्यावर उतरलो. जेवण केले आणि पुढील प्रवासासाठी निघालो.
अंधार खूप दाटला होता. रात्रीचे दहा वाजले होते. रस्ता एकदम सामसूम होता. रस्त्यावर आमच्या गाडी व्यतिरिक्त एकही गाडी दिसत नव्हती अथवा एक माणूसही दिसत नव्हता. सगळीकडे अंधारच अंधार. त्यात रस्त्यात घाट लागला आणि तेवढ्यात कसलातरी आवाज झाला. म्हणून आम्ही लगेच गाडी थांबवली आणि उतरून मागे आलो तर एक दारुडा बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्याला चुकून आमच्याच गाडीचा कट लागला होता. तिथे मागून येणाऱ्या दोन गाड्या थांबल्या व त्याला दवाखान्यात घेऊन गेले. आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. घाट संपला रस्त्यावर बोर्ड लावला होता सिद्धटेक ८८ किमी. आम्हाला थोडा धीर आला. पण तरीही तिथल्या कुत्र्यांच्या आवाजामुळे आम्हाला खूप भीती वाटत होती. मग आम्ही देवांचे गाणे, गाण्याच्या भेंड्या खेळायला सुरुवात केली. त्यात आमचा जवळ जवळ एक तास गेला. पुढे गेल्यावर आम्हाला एक रेल्वे ट्रॅक लागला. आम्हाला वाटले रेल्वे ट्रॅक पार करून जायचे म्हणून आम्ही तो पार करून पुढे जात राहिलो पण रस्त्यावर कुठे बोर्ड दिसेना का कोणते हॉटेल किंवा वस्ती काहीच नव्हते. मग आम्ही आणखीनच घाबरलो. आमच्या गाडीच्या लाईट ने एक माणूस पुढे चालताना दिसला त्याला गाडी थांबवून विचारणा केली,”सिद्धटेकला जायला रस्ता हाच आहे का?” तो म्हणाला,”हो तुम्ही एकदम बरोबर चालला आहात, इथून सरळ जा तुम्हाला एक चौफुली लागेल तिथून लेफ्ट टर्न मारून सरळ जा लगेच तुम्हाला मंदिराचा परिसर दिसेल”.
मग आम्ही त्या माणसाने सांगितल्यानुसार सरळ जाऊन चौफुलीवर लेफ्ट टर्न घेतला सरळ जात राहिलो राहिलो पण कुठे मंदिर येत? रस्त्यावर सगळा अंधारच अंधार. रात्रीचे १२ वाजत आले होते तरीही आम्हाला काही रस्त्यावर बोर्ड दिसेना आम्हाला वाटले की आम्ही रस्ता चुकलो पण तरीही पुढे जात होतो, शेवटी पुढे गेल्यावर एक टपरी उभी असलेली दिसली. त्या टपरीवाल्याला विचारले,”सिद्धटेकला जायचा रस्ता हाच का?” तो पण बोलला हो बरोबर आहे सरळ जा” पुढे निघालो जाता जाता परत एका सायकलस्वारला विचारले असता त्याने संगितले ,”तुम्ही खूप पुढे आलात सिद्धटेकला जायला पाठीमागून लेफ्ट टर्न होता”. मग परत आम्ही गाडी फिरवली आणि सरळ आलो तेव्हा आम्हाला राईट टर्नला बोर्ड दिसला त्यावर लिहिले होते सिद्धटेक ३० किमी. बापरे आम्ही आणखीन घाबरलो कारण आधीच आम्ही जीव खात खात इथपर्यंत आलो होतो ते अजुन पुढे ३० किमी जायचे होते.
मग राईट टर्न घेतला आणि सरळ निघालो सरळ जातोच आहे जातोच आहे कुठे मंदिर येत? तरी पुन्हा तीच परिस्थिती आजूबाजूला कुत्रे भुंकत होती, वेगवेगळे कसले भयानक आवाज येत होते. खूप भीती वाटत होती. ड्रायव्हर काकांना म्हटलो,”काका लवकर चालवा ना खूप भीती वाटते आहे”. मग काकांनी गाडीत गाणे लावले म्हणजे त्यामुळे तरी भीती वाटणार नाही. पण कसले काय उलट गाणे लावल्यानंतर अजूनच भीती वाटायला लागली. शेवटी काकांना गाणे बंद करायला लावले.
जाता जाता पुन्हा बोर्ड दिसला, लिहिले होते सिद्धटेक १० किमी. तरी सुद्धा आणखी १० किमीचा रस्ता पार करायचा होता. त्यात अजुन रस्त्याने लागली शेती आजूबाजूचा प्रदेश पूर्ण शेतीने व्यापला होता. त्या शेतीतून बोळी सारखा निघालेला रस्ता वाटत होता. एवढे पुढे आल्यानंतरही रस्त्यावर कुठेही लाईट नव्हती. आम्हाला वाटले आम्ही पोहोचतो की नाही मंदिरात? देवाचे नाव घेत घेत चाललो होतो रस्त्यावर पुन्हा एक बोर्ड दिसला लिहिले होते सिद्धटेक ३ किमी. म्हटले चला आले मंदिर पण कसले काय? चाललोच आहोत चाललोच आहोत कुठे दिसते मंदिर? आम्हाला जरा डाऊट आला की चुकलो की काय पुन्हा? पण आता मात्र विचारायला कोणीही दिसत नव्हते त्यात आमच्या सर्वांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन झालेली. तितक्यात एक माणूस पायी पायी रस्त्याने चालला होता त्याला विचारले असता तो बोलला तुम्ही सिद्धटेक गावात आला आहात फक्त अजुन थोडे पुढे जा मंदिराचा परिसर दिसेल. एवढे ऐकून आम्ही सरळ गेलो तेव्हा उजव्या बाजूला लिहिले होते वर कमानीवर “आपले सिद्धटेक शहरात हार्दिक स्वागत” तेव्हा कुठे धीर आला जरासे हायसे वाटले त्या कमानीतून आत गेलो तेव्हा बाजूलाच मंदिर दिसले. तिथल्या पुजारीशी भेट घेतली. आणि लॉंस शोधून तिथे त्या दिवशी मुक्काम केला. तदनंतर सकाळी लवकर उठून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन नाष्टा केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो.
- – नयन सुनील धारणकर, नाशिक
- 8275838083