कंगना रनौतवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल

14

कायम आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या विळख्यात अडकली आहे. वांद्रे कोर्टात अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करा, असे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. यावेळी कंगनावर बॉलीवूडमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप लावण्यात आला आहे.

वांद्रे कोर्टामध्ये कंगनाविरोधात दोन व्यक्तिंनी याचिका दाखल केली होती. याचिकेत असा आरोप करण्यात आला आहे की कंगना बॉलीवूडमधील हिंदू आणि मुस्लिम कलाकारांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय तिने हिंदू-मुस्लिम समुदायात धार्मिक तेढही निर्माण केले. तसेच हिंदू-मुस्लिम समुदायाचे मतभेद निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे असे आरोप तिच्यावर लावले आहेत.

ही याचिका मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सय्यद यांनी दाखल केली आहे. याचिकेमध्ये असे म्हटले आहे की, कंगना सतत बॉलीवूडला काहींना काही बोलून वादात पडत असते. यानंतर कंगनाची चौकशी होण्याची शक्यता आहे. कलम 124 अ, 153 अ, 295 अ, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

कंगनाची बहीण रंगोली विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंगना आणि रंगोली या दोघींची चौकशीसाठी समन्स बजावण्यात येणार आहे. यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर दोघींना अटकही करण्यात येईल.