देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढतच आहे. कोरोना आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सर्वच स्तरातून केले जात आहे. मात्र, अजूनही कोरोनावर ठोस औषधोपचार उपलब्ध नसल्याने लक्षणानुसार डॉक्टर रूग्णांवर उपचार करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाला दुर ठेवण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगितला आहे. ‘कोरोनाची लस प्राप्त होईपर्यंत मास्कच हीच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यासाठी मास्क, सुरक्षित अंतर व हातांची स्वच्छता अशी सर्वांनी काळजी घ्यावी,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. तर रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्राचा कोरोनाचा लढा निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.