कधीच ट्रेंडींग नसणारा शेती हा विषय सध्या ट्रेंडींग आहे. त्याला कारणही तसच आहे. केंद्र सरकारने शेती विषयी तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर केली आहेत. बहुमत असल्याने कोणत्याही अडथळ्याविना ही विधेयके मंजूर करण्यात आली. मात्र, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनीच या विधेयकाला विरोध दर्शवत राजीनामा दिला असल्याने केंद्र सरकारची कोंडी झाली आहे.
दरम्यान, केंद्र सरकारकडून रविवारी राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयके मांडण्यात आली होती. विरोधी पक्षांकडून या विधेयकांना कडाडून विरोध करण्यात आला. त्यावेळी काही खासदारांनी सभागृहाच्या वेलमध्ये येऊन गोंधळ घातल्या प्रकरणी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे खासदार सभापती एम.व्यंकय्या नायडू यांनी 8 खासदारांचे निलंबन केले आहे.
गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांतील आठ खासदारांना संसदेच्या उर्वरित अधिवेशनापर्यंत निलंबित केले आहे. यामध्ये खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, संजय सिंह, रिपुन बोरा, नजीर हुसैन, केके रागेश, ए करीम, राजीव सातव आणि डोला सेन यांचा समावेश आहे.