चर्चा पुरे.. ‘हे’ आहे अटल बोगद्याचे सामरिक महत्व

12

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतेच मनाली आणि लेहला जोडणाऱ्या अटल रोहतांग बोगद्याचं उद्घाटन केलं. याची लांबी 9.02 किमी असून 3000 मिटर उंचीवर बांधला गेला आहे. हा बोगदा मनालीला लाहौल-स्पीती खोऱ्याशी जोडतो. या भागात मोठी बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळ्यात येथे पोहोचणे अतिशय कठीण असते. या पूर्वी मनालीहून सिस्सूला पोहोचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात, आता हे अंतर केवळ एका तासात पार होणार आहे. बोगदा सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे देशापासून संपर्क तुटणारे सर्व भाग संपूर्ण वर्षभर जोडले जाणार आहेत. तसेच या बोगद्यामुळे मनाली आणि लेहचे अंतर कमी होणार आहे. आता रोहतंग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी ४७४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. अटल बोगद्यामुळे हे अंतर ४२८ किलोमीटर इतके राहणार आहे. या बोगद्यामध्ये कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून सर्व अत्याधुनिक सुविधा बोगद्यात उपलब्ध आहेत.

शिवाय भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी सुद्धा हा बोगदा महत्वपूर्ण भूमिका पार पाडणार आहे. सध्या लडाखमध्ये जाण्याकरता भारतीय सैन्याला दोन रस्ते उपलब्ध आहेत. पहिला रस्ता हा जम्मू-श्रीनगर-जोझिला खिंड-द्रास-कारगिलमधून जातो आणि दुसरा रस्ता हिमाचल प्रदेशमधून रोहतांग खिंडीतून मनालीद्वारा लेहला पोहोचतो. परंतु हे दोन्ही रस्ते वर्षातून पाच ते सहा महिने बर्फ पडल्याने बंद असतात. परंतु आता अटल टनेलमुळे हिमाचल प्रदेशमधला रस्ता नऊ ते दहा महिने उघडा राहू शकेलं. त्यामुळे भारतीय सैन्याला लवकर रसद मिळण्यास मदत होईल.

भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांनी सण 2000 मध्ये मनाली ला लेहसोबत जोडणाऱ्या प्रकल्पाची घोषणा केली होती. आज त्या प्रकल्पाला अटलजींचच नाव देण्यात आले आहे.

दीपक शेळके