विशाल पट्टोपाध्याय
भारतीय प्रेक्षकांची सस्पेन्स थ्रिलरची आवड लक्षात घेऊन आलेला एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणजे ‘हलाहल’! या चित्रपटाचं वैशिष्ट्य हे कि हा त्या चित्रपटांत गणला जाईल ज्यात समाजाचे वास्तववादी चित्रण दाखवले आहे. म्हणजे उगाच सस्पेन्स थ्रिलर आहे म्हणून वेगवेगळे प्रयोग केलेलं नाहीत कि शेवटला आपण अपेक्षित करत असतो तशी एंडिंग सुद्धा नाही. एखादा सामान्य माणूस न्याय मिळवण्यासाठी किती खोल जाऊ शकतो आणि आपली भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणा आणि त्यातील राजकीय वर्चस्ववाद त्या व्यक्तीला किती हतबल करू शकतो याचे जबरदस्त चित्र हलाहल मधून पाहायला मिळते.
डॉ. शिव शंकर शर्मा यांची मुलगी अर्चना जी मेडिकल स्टूडंट आहे तिचा ट्रक अपघातात मृत्यू होतो, मात्र तो मृत्यू म्हणजे आत्महत्या आहे हे दाखवण्यासाठी तिच्याच कॉलेजचे डीन, पोलीस आणि बड्या राजकीय नेत्याचा खटाटोप सुरु असतो. आपल्या मुलीने आत्महत्या केलेली नाही तिचा खूनच झाला आहे हे अगदी ठामपणे डॉक्टर शर्मांना वाटत असतं. ही स्टोरीलाईन काहीशी टिपिकल वाटत असली तरी ती भारतात घडून गेलेल्या एक मोठ्या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या उत्कंठावर्धक कथेमुळे आणि साजेश्या अभिनयामुळे तितकी टिपिकल राहिलेली नाही. या कथेची दुसरी बाजू असलेला आणि कथेमध्ये अधिक रंग भरणारा अतिशय भ्रष्ट पोलीस युसुफ कुरेशी डॉक्टर शर्मांना पैश्यासाठी मदत करायचे ठरवतो. इथून मग सगळा थरार सुरु होतो आणि डाव प्रतिडाव खेळले जातात.
पुढे काय होते? दोघांना सत्य सापडते का? जे दिसत असतं तसंच सगळं असतं का? कोण कोणाचा विश्वास घात करतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी हलाहल पहायला हवा. डॉ. शर्मांचे अतिशय असहाय्य पात्र वठवण्यात सचिन खेडेकर यशस्वी झाले आहेत आणि त्यांच्या पेक्षा जास्त भाव खाणारा पोलीस साकारण्यात बरूण सोबातीला सुद्धा यश आले आहे. एका वाक्यात सांगायचे तर कथा, पटकथा आणि अभिनय आणि सगळं काही उत्तमरित्या जुळून आलं आहे.
या आधी आलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटां पेक्षा हा चित्रपट काहीसा संथ वाटू शकतो. पण वेग मुद्दाम तसा संथ ठेवला असावा, यामुळे चित्रपट जास्त वास्तवदर्शी वाटतो. चित्रपटाचा शेवट काही काळ मन सुन्न करून जातो.फिल्म Eros Now वर उपलब्ध आहे.