विशाल पट्टोपाध्याय
C U Soon….पूर्णपणे आयफोन वर शूट करण्यात आलेला व मुख्य म्हणजे कॉम्प्युटर व मोबाईल स्क्रीनच ज्या चित्रपटाचा सेट आहे असा भारतातील हा पहिलाच चित्रपट असावा. म्हणजे जे काही घडतं ते कॉम्प्युटर व मोबाईल स्क्रीनवरच! म्हणूनच हा चित्रपट बघायलाच हवा या कॅटेगरीतला आहे. नेहमीप्रमाणे मल्याळम चित्रपट सृष्टीने फिल्मेकिंग मधला अजून एक मास्टरपीस C U Soon च्या माध्यमातून निर्माण केला आहे. अभिनय, दिग्दर्शन युनिकनेस आणि खास करून एडीटिंगला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील.
दुबईमध्ये काम करणारा जिम्मी डेटिंग एप्पद्वारे अनु नवाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा असते. आपल्या सायबर सिक्युरिटी मध्ये तज्ञ असलेल्या चुलत भावाकडून तिच्याबद्दल तो ऑनलाईन माहिती सुद्धा काढतो. पण एके दिवशी जखमी अनु कॉल करून जिम्मीला मदतीसाठी बोलवते. तो तिला आपल्या घरी घेऊन येतो. तिच्या वडिलांनी तिला मारहाण केल्याचा संशय त्याला येतो. तो जाऊन तिच्या वडिलांशी बोलतो. लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवतो आणि हि गोष्ट अनुला कळताच ती जिम्मीची माफी मागून निघून जाते.घाबरलेला जिम्मी आपला चुलत भाव केविनची मदत घेतो आणि काहीही करून तिला शोधायला सांगतो. तिच्याबद्दल काहीच माहिती नसतानाही केविन तिचा ऑनलाईन कसा शोध घेतो त्थाचा थरारक प्रवास म्हणजे हा चित्रपट!
चित्रपटाचे साधर्म्य दोन वर्षांपूर्वी आलेल्या Searching सारखे वाटत असले तरी C U Soon हा पूर्णपणे वेगळा चित्रपट आहे. Searching हा C U Soon पेक्षा उजवा यासाठी ठरतो कारण Searching हा शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. C U Soon मध्ये शेवट जवळ यायच्या आधीच अनुचं रहस्य काय आहे याचा अंदाज लागतो आणि तो बरोबर सुद्धा ठरतो. पण तरीही एक अत्यंत क्रियेटीव्ह आणि उत्तम भारतीय कलाकृती म्हणून C U Soon पहायला हवा.
अमेझोन प्राईमवर इंग्लिश सबटायटल सह उपलब्ध आहे… !