चित्रपट: ‘KAITHI’ एक जबरदस्त ऍक्शनपट

21

विशाल पट्टोपाध्याय

Kaithi…माझ्यासाठी २०१९ च्या सर्वोत्तम ऍक्शन मुव्हीजमध्ये पहिल्या 3 क्रमांकात बसणारी मुव्ही! प्युअर साउथ इंडियन ऍक्शन प्रकारात मोडणारा हा चित्रपट….पण प्रत्येक सीन हा खिळवून ठेवणारा! चित्रपटाची खासियत ही की पूर्ण कथा एका रात्रीमध्ये घडते आणि व्हिलन आणि हिरोचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. हो, सहसा आपण प्युअर साउथ इंडियन ऍक्शन मुव्हीमध्ये काय पाहतो तर हिरो आणि व्हिलनचा काहीतरी भूतकाळ असतो आणि शेवटी हिरो व्हिलनचा बदला घेतो. Kaithi च्या सुरुवातीला सुद्धा असचं काहीतरी वाटू लागतं, पण आपला अंदाज पूर्णपणे चुकतो आणि वेगळ्या धाटणीची कथा समोर उलगडत जाते.

पोलीस अधिकाऱ्यांकडून ड्रग्सची तस्करी करणाऱ्या एका गँगचा मोठा माल जप्त केला जातो. या टोळीचा म्होरक्याचा भाऊ अनबुला काहीही करून अंदाजे 800 कोटींचा हा माल परत हवा असतो. त्यासाठी पोलीस खात्यातीलच काही अधिकारी हाताशी धरून अनबु ज्या कमिशनर ऑफिसमध्ये हा सगळा मला लपवून ठेवलेला असतो त्यावर हल्ला करण्याचा प्लान आखतो, पण त्यासाठी त्याला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना कमिशनर ऑफिसच्या बाहेर ठेवावं लागणार असतं. अशावेळी त्याच्या पथ्यावर पडते पोलीस कमिशनरांनी निवृत्तीनिमित्त सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिलेली पार्टी, या पार्टीत दारूमध्ये एक विशेष ड्रग्ज मिसळून सर्व पोलीस अधिकाऱ्यांना काही तास बेशुद्ध पाडण्याचा प्लान असतो. मात्र बिजोय हा ड्रग्ज पकडणारा मुख्य पोलीस अधिकारी दारू न पिल्याने बचावतो आणि आता या सर्व 30-40 बेशुद्ध पडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा जीव वाचवण्याची तसेच ड्रग्जचा साठा अनबुच्या हाती न लागू देण्याचे आवाहन असते. आता तुम्हाला वाटत असेल कि हा बिजॉय मुख्य हिरो आहे का? तर नाही…या सगळ्या थरारात फुल्ल स्टाईल मध्ये दिल्लीची एन्ट्री होते आणि हा दिल्लीच आहे कथेचा नायक ‘Kaithi’ अर्थात (कैदी)!

कथा अशी थोडक्यात वाचल्यावर सामान्य वाटते पण त्याला अनेक पैलू आहेत पण सगळ्यात जबरदस्त आहे खिळवून ठेवणारी ऍक्शन! जंगलातील ऍक्शन सिन्स कमाल आहेत! हा चित्रपट अभिनेता कार्तिक ज्याला कार्ती या नावाने ओळखले जाते त्याच्या करियर मधला टर्निंग पॉइंट ठरला आहे आणि ज्या प्रकारे जीव ओतून त्याने एक रांगडा, बेफिकीर पण तितकाच मायाळू दिल्ली साकारला आहे त्यासाठी या यशाला तो पात्र ठरतो.

अजून तरी चित्रपट हिंदीत उपलब्ध नाही. पण लवकरच येईल. गोल्डमाईन टेलीफिल्म्सच्या नजरेतून हा चित्रपट सुटणे शक्य नाहीच, पण तोवर सबटायटल्सचाच सहारा आहे.