चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी चिनी सैनिकांना युद्धाला तयार राहा, असे जाहीरपणे सूचित केले आहे. चीनकडून अशाप्रकारे युद्धाची गर्जना होत असताना मोदी सरकारमधील नेते इतके शांत कसे ? असा सवाल भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्य एकमेकांपुढे उभे ठाकले आहे. काही दिवसांपूर्वी गलवान खोऱ्यात स्थिती चिघळली होती. त्यावर उभय देशांमध्ये अनेकवेळा चर्चा झाल्या. मात्र, त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, यावर सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून भाजप नेत्यांना चिमटे काढले. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सीमारेषेवरील आपल्या सैन्याला युद्धासाठी तयार राहा, असे सांगितले. तरीही मोदी सरकारमधील एकही नेता त्याला प्रत्युत्तर देत नाही. आम्ही तुम्हाला सरळ किंवा वाकड्या कोणत्याही मार्गाने घरी पाठवण्यासाठी समर्थ आहोत, हे एकाही नेत्याने ठणकावून सांगू नये, हे आश्चर्यकारक असल्याचे सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.