संयुक्त राष्ट्रसंघाने दिनांक १६ ऑक्टोबर १९४५ रोजी ‘जागतिक अन्नदिन’ पाळण्याचे ठरविले. तेव्हापासून ‘फूड अँड ऍग्रीकल्चर ऑर्गनायझेशन’ या जागतिक उपक्रमाद्वारे तो दिवस दरवर्षी १६ ऑक्टोबर रोजी पाळला जात आहे. आज ७५ वर्षे लोटली तरी वैज्ञानिक प्रगतीत गगनभरारी घेतलेल्या मानवास मात्र अन्नाची ‘किंमत’ करता येत नाही, हे दुर्भाग्यच ! गोंदिया जिल्ह्यातील खाडिपार येथील एक संत महात्मा होते. त्यांच्या सानिध्यात प्रत्यक्ष कृतीतून अन्नाची किंमत जाणता येत होती. त्यांचे नाव ब्रह्मलीन सदाशिवजी डोंगरे. मागील वर्षांपर्यंत ते ज्ञानप्रचारक म्हणून संत निरंकारी मिशनमध्ये सेवा देत होते. ते जेवताना एकही कण खाली पडू देत नसत. भोजनपश्चात ते आपले ताट हाताने चाटून-निरपून स्वच्छ करीत, धुतल्यासारखे ! सोबतची व्यक्ती हमखास धडा शिकत होती, “कण कण में भगवान !” सांगा, मग ती व्यक्ती ही चांगली सवय अंगिकारल्याखेरिज राहिलच कशी? अन्नामुळे सजीवसृष्टी जिवंत आहे. म्हणूनच संतांनी बजावले आहे – “अन्न हेच पूर्णब्रह्म !
शेतकरी बांधवांकडील अन्नधान्य सहकारी व सरकारी खरेदी केंद्रे अल्पदराने खरेदी करीत असतात. ही खरेदी केंद्रे उघड्यावर कोठेही थाटली जातात. त्यात प्रामुख्याने कृषिउत्पन्न बाजार समित्या व सामाजिक विकास महामंडळे अग्रेसर आहेत. साधे शेड किंवा गोदाम न उभारताच अन्नधान्यांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी उघड्यावर लावली जाते. पावसाळ्यास प्रारंभ होऊनही त्यांची योग्य तजवीज लावली जात नाही. त्यामुळे दरवर्षी लाखो पोती अन्नधान्य सडून नासधूस होत असते. या सडलेल्या अन्नधान्यांच्या दुर्गंधीमुळे मनुष्यासह प्राण्यांनाही आजारांचा सामना करावा लागतो. यंदा कोरोना प्रकोपाच्या काळात हातावर पोट असणारे लोक भुकेकंगाल झाली आहेत. अशा बिकट परिस्थितीत ते धान्य नक्कीच कामी पडले असते. गडचिरोली जिल्ह्यात तर खरेदी केंद्रावरील धानाची नासधूस ही नित्याची बाब झाली आहे. पावसाळ्यात धान भिजून अंकुरतात व हिरवीगार रोपे डोलू लागतात. गाईगुरे, डुकरे, कुत्रे आदी पोती तिडून-फाडून नासधूस करतात. धान सडले की दुर्गंधीमुळे माणूसच काय? तर प्राणीसुद्धा तिकडे ढुंकून पाहात नाहीत.
धान नासधुसीच्या नुकसानीवर खरेदी केंद्राच्या वतीने तेथील कर्मचारी स्पष्टीकरण देऊन तारे तोडतात की शेतकऱ्यांना त्यांचे पूर्ण चुकारे दिलेले आहेत. जी हानी झाली ती केंद्राची आहे. ही हानी खरे तर त्यांचीही नाही. ती गरजूंची होते. कारण म्हटले जाते, “दाने दाने पर लिखा होता हैं, खाने वाले का नाम !” हेच सत्य. कोरोनासारख्या अगदी तंगातंगीच्या काळातच सरकारी स्वस्त धान्य दुकानातून एकेक महिना गॅपने धान्य पुरवठा होतो. तर कधी तुटपुंज्या पुरवठ्याच्या कारणाने कमी धान्य मिळते. त्याला कारणीभूत हाच ना अनागोंदी कारभार अन् सावळा गोंधळ? ज्या कृषी उत्पादनावर अख्ख्या राष्ट्राची पोटे पालवली जातात, त्याची अशी सर्रास हेळसांड होते. ही त्या राष्ट्राची लाजिरवाणी आनाकानीच नाही का?
जागोजागी आपल्याला अन्नाची नासाडी होतांना आढळून येते. खानावळ व हॉटेल्समध्ये जाऊन बघितले तर ताटात उष्टे अन्न सोडून देणारे महाभाग काही कमी नाहीत. यावर त्यांचा उलट टपाली जबाब असतो, “यात माझा पैसा खर्च झाला. त्यात तुझ्या बापाचा काय गेला?” आता गडचिरोलीतील हॉटेलमालक ते अन्न गोळा करून पशुपालक जसे – वराहपालक, गोपालक आदींना देऊन टाकतात. ते नेऊन आपल्या जनावरांना खाऊ घालतात. नागपूर, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये ‘फूड दोस्ती अॅप’ यावर ऑनलाईन माहिती प्रसारित केली जाते. गरजू व्यक्ती सदर पत्त्यावर येऊन अन्न घेऊन जात असतो, हे खरेच कौतुकास्पद ! अशाप्रकारेच लग्न समारंभात होणारी अगणित नासाडी रोखण्यासाठी समाजसेवी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे अगत्याचे झाले आहे. भोजनप्रसंगी कार्यकर्त्यांनी “(१) ताटात उष्टे अन्न सोडू नये. (२) हवे तेवढेच पदार्थ लागते-लागतेच घ्यावेत. (३) मुलांचे ताट पूर्ण भरू नये. इत्यादी सुचनांचे फलक हातात घेऊन उपस्थितांचे प्रबोधन केले जावे. यास वऱ्हाडी मंडळीकडून कसा प्रतिसाद मिळेल? याची प्रचिती घेणे समयोचित ठरेल.
लग्नात नवरा-नवरींच्या डोक्यांवर अक्षदा टाकण्याची फार जुनी परंपरा रुढ झाली आहे. ती काही केल्या मोडीत निघत नाही. राष्ट्रपिता शिक्षणसम्राट महात्मा जोतिबा फुलेंनीसुद्धा यापरंपेरस फाटा देण्याचं सुचविलं होतं. त्यांनी अगदी साध्या सत्यशोधक पद्धतीनं काही लग्नंही लावली होती. त्यांत तांदळांच्या अक्षदांऐवजी फुलं टाकली होती. साधा हिशेब काढून अवश्य बघाच. टाकण्यात येणाऱ्या अक्षदांमधून १० टक्केच अक्षदा वधु-वरांच्या डोक्यावर पडतात. एका अभ्यासपूर्ण सर्व्हेक्षणानुसार एका लग्नात सरासरी ५ कि.ग्रा. तांदूळ उपयोगात आणला जातो. त्यातील केवळ अर्धा कि.ग्रा. तांदूळच वधु-वरांच्या डोक्यावर पडतो. मात्र उर्वरित सगळं पायदळी तुडवलं जातं. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी दीड लाखाहून जास्त विवाह सोहळे होतात. सुमारे ६ लाख कि.ग्रा.तांदळाची अशी बेमुर्वत नासाडी होत असते. ही गोष्ट लक्षात घेऊन काही सामाजिक व स्वयंसेवी संस्था हे अक्षदाचं तांदूळ एकत्र जमा करून ते गरजूंना दान करतात. हाही एक प्रेरणादायी पर्याय म्हणावं लागेल! आपल्या भारत देशात कुपोषणामुळं दर मिनिटाला दोन बळी जातात. घरां-घरांत इन मीन सव्वातीन माणसं असतात. त्यांच्यासाठी नको तेवढं रांधलं जातं आणि सकाळी ते रात्रीचं उरलेलं अन्न शिळं झालं म्हणून फेकून दिलं जातं. नामांकित हॉटेल्समधून पार्सल आणलं की घरच्या पोळी, भात, वरण, भाजी आदींकडं ढुंकूनही बघितलं जातं नाही. कारण त्याच्यापुढं या अन्नाची किंमत शून्य ठरवली जाते. उत्पादित अन्नधान्य, भाजीपाला व फळं यांतील सुमारे ४० टक्के सडून, फुटून व सांडून वाया जातात. त्यामुळं अन्नाची नासाडी टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व उपायांची नितांत गरज भासत आहे. यासाठी खेड्यात व शहरातही नानाविध उपक्रमं राबविली जावीत, असे वाटते.
लग्न सोहळ्यातील जेवणावळीचे स्वरुप पार बदलले आहे. आता भारतीय पंगतीची पारंपारिक पद्धती बाद ठरली असून त्याची जागा विदेशी बुफेच्या हलकट पद्धतीने घेतली आहे. तशी काळानुरूप ही पद्धती एकदम वाईटही म्हणता येणार नाही. मात्र पंगत लावून वाढण्याचा त्रास वाचविला जातो. यांत वारंवार उठून अन्नपदार्थ स्वतः घ्यावे लागतात. त्यामुळे अनेक जण एकदाच गरजेहूनही अधिक अन्नपदार्थ ताटभरून घेत असतात. लहान खिरड्या पोरांटोरांच्या ताटातही सर्व पदार्थ उचलून कोंबले जातात. या हावऱ्या वृत्तीमुळे अन्नाची बेसुमार नासाडी पूर्वीपेक्षाही अधिकच होऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन अनेक मंगल कार्यालयांद्वारे उरलेले अन्न गरजूंना वाटले जात आहे. विविध संस्थाही या पुण्यशील कार्यासाठी पुढे सरसावत आहेत. यामुळे शिजलेले अन्न वाया न जाता गरजू व्यक्तींच्या मुखात दोन घास पडत आहेत. खरेच अशांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच वाटते. हीच तर खऱ्याखुऱ्या आजच्या काळाची गरज आहे!
श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी, गडचिरोली.