जालन्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरी चोरट्यांनी पळवली

14

जालना जिल्ह्यातल्या वाटूरमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची तिजोरीच चोरट्यानं पळवून नेल्याची घटना घडली आहे. वाटूरमधील जयपूर रोडवरील मार्केट कमिटीत जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. रात्री दोनच्या नंतरची ही घटना आहे.

सुरुवातीला चोरट्यांनी बँकेचं शटर उचकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न चोरट्यांचा फसल्यानंतर बँकेच्या पाठीमागील भिंत फोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. बँकेतील तिजोरी फुटली नसल्यानं चोरट्यांनी तिजोरीच पळवून नेली. या तिजोरीत 6 लाख 62 हजार 900 रुपये असल्याची माहिती बँक मॅनेजरनं दिली आहे. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिव्हीआरही चोरट्यांनी चोरून नेला. विशेष म्हणजे हे सर्व पैसे विविध योजनांद्वारे शेतकर्यांना वाटपासाठी आलेले होते.घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.