डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभ्यासिका, ग्रंथालय, वसतिगृह सुरू करा या मागण्यांसाठी विविध विद्यार्थी संघटनानी विद्यापीठात आक्रमक आंदोलनं केली. सत्यशोधक विद्यार्थी संघटना, एस एफ आय ने ठिय्या आंदोलन करत विद्यापीठ प्रशासनाला निषेध नोंदवला. अभाविप विद्यार्थी संघटनेने अभ्यासिकेचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुलूप तोडू शकले नाही. लोकेश कांबळे, दीक्षा पवार, अमोल खरात, कल्पना कांबळे या आंदोलक विद्यार्थ्यांना बेगमपुरा पोलिसांनी ताब्यात घेतले. अर्धा तास ठाण्यात बसवून घेत, नंतर त्यांना सोडून देण्यात आले.
त्याचबरोबर एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेने विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहाद्दूरे यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रवीण वक्ते यांना वसतिगृह, अभ्यासिका सुरू करण्यासाठी निवेदन दिले.
कोरोना महामारिमुळे १७ मार्च पासून विद्यापीठातील वसतिगृह, अभ्यासिका, ग्रंथालय पूर्णपणे बंद आहे. मात्र, जसजसे अनलॉक होत आहे, तसे विद्यार्थी पुन्हा एकदा अभ्यासासाठी विद्यापीठात रवाना झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सर्व विद्यार्थी संघटनांच्या मागण्या आहेत. एकीकडे विद्यापीठ प्रशासन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत आहे. पण, विद्यार्थ्यांनी अभ्यास कुठे करावा ? कुठं राहावं ? आणि ग्रंथालयातून पुस्तकं कशी मिळवावी असा सगळाच पेच असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.