तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेतील प्रसिद्ध कलाकार ‘गोगी’ला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मिडियावर पोस्ट लिहीत समय शाहने(गोगी) यासंदर्भात माहिती दिली आहे. एका अज्ञात व्यक्तीने त्याच्या सोसायटीमध्ये शिरून त्याला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन तो व्यक्ती तेथून पसार झाला.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, यापूर्वीही दोन वेळा समयवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्या आईने सांगितल्यानुसार काही गुंड इमारतीच्या आवारात अचानक घुसले, त्यांनी समयवर हल्ला केला. याबाबत जाब विचारताना गुंडांनी अश्लील शब्द वापरले आणि शिवीगाळ केली. ही सर्व घटना शुक्रवारी शूटिंगवरून परत आल्यानंतर 8.30 च्या सुमारास घडली आहे. मागील खूप दिवसांपासून समयला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. हे धमकी देणारे लोक कोण आहेत हे समयला माहिती नाही. इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेज आधारे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे.
समयने ‘मी ही माहिती पोस्ट करत आहे, जेणेकरून माझ्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना या गोष्टीची माहिती असावी. असे म्हंटले आहे. तसेच त्याने सोशल मिडियावरील स्टोरिमध्ये शेअर केलेल्या चित्रात एक व्यक्ती दिसत आहे. हा फोटो त्याच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून घेतला आहे. दरम्यान, बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी त्याने तक्रार दाखल केली असुन, यासंदर्भातील एक सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.