तेजस ठाकरेंना मिळाली आशिष शेलारांकडून कौतूकाची थाप

6

भाजपा नेते आशिष शेलार हे नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहित. मात्र आशिष शेलार यांनी चक्क उध्दव ठाकरे यांचे पुत्र तेजस ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. हे कौतूक करण्यामागे कारणही तसेच जबरदस्त आहे. तेजस ठाकरे यांनी माशाच्या एका प्रजातीचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात हिरण्यकेश नदीत ठाकरे यांना माशाची ही प्रजात सापडली. याआधी खेकड्याच्या अनेक प्रजाती ठाकरे यांनी शोधल्या आहेत.

 ट्विटरवरुन शेलार यांनी तेजस ठाकरेंचं कौतुक केलं आहे. शेलार म्हणाले, “जीवसृष्टीला निसर्गाने अफाट वैविध्य आणि जगण्याचे विलक्षण रंग दिले. त्या अज्ञात अविष्कारांचे रंग तेजस उध्दव ठाकरे हे जगासमोर आणत आहेत. त्यांनी सोनेरी केसाच्या माशाची चौथी ‘हिरण्यकेशी’ प्रजाती शोधली, त्यांचे हे काम महाराष्ट्राची मान उंचावणारे असून हे महान कार्य आहे.”

ही प्रजाती हिरण्यकश नदीत सापडल्यामुळे त्याचे नाव हिरण्यकेशी असं ठेवण्यात आलं आहे. हिरण्यकेशी हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ सोनेर रंगाचे केस असणारा असा होतो. या संशोधनाचे नेतृत्व डॉ. प्रवीणराज जयसिन्हा यांनी केलं. त्यांनीच या संशोधनासंदर्भातील पेपर सादर केला आहे. या संशोधन कार्यात प्रवीणराज आणि तेजस यांना पाण्याखाली छायाचित्रण करण्यासाठी प्रसिद्ध असणारे छायाचित्रकार शंकर बालसुब्रमण्यम यांचे सहकार्य मिळाले.