उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेश येथील हाथरस गावातील पीडितेला एमआयएम पक्षाच्या वतीने औरंगाबाद शहरात श्रद्धांजली देण्यात आली. औरंगाबाद चौकात एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यावेळी उपस्थित होते. इम्तियाज जलील यांनी भाजप व योगी सरकारवर जोरदार टीका केली.
घटनेतील बलात्काऱ्यांना औरंगाबादमधील क्रांती चौकात फासावर लटकावयाला पाहिजे. देशात जे सुरू आहे ही येणाऱ्या काळाची झलक आहे. भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर का उतरत नाहीत. त्यांच्या घरात मुली, आई, बहिणी नाहीत का?”, असा संतप्त सवाल यावेळी जलील यांनी उपस्थित केला.