भाजपाचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे अवघ्या दोन ओळीत त्यांनी भाजपा सोडत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांची सून रक्षा खडसे यादेखील भाजपाला राम राम ठोकत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधतील अशी चर्चा राजकिय वर्तुळात होती.
मात्र रक्षा खडसे या राष्ट्रवादी किंवा कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या, “मी भाजपकडून निवडून आले आहे, भाजपची उमेदवार म्हणून मला निवडून दिले, त्यामुळे पक्षाचेच काम करणार आहे. त्यांनी राजीनामा दिला म्हणून मीही राजीनामा दिला पाहिजे असा दबाव माझ्यावर नाहीनाथाभाऊंची नाराजी पक्षावर नव्हे”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचे निमंत्रण माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी दिले आहे. मी एक पक्षाचा सच्चा सैनिक म्हणून पंकजाताईंना विनंती करतो त्यांनी सेनेत यावं अस अर्जुन खोतकर म्हणाले आहेत. पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून राजकीय अज्ञातवासात असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, त्यांनी सध्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी दौरा केला आहे. पंकजा मुंडे यांना हळुवार बाजूला केलं जात असल्याचं त्यांच्या समर्थकांच म्हणणं आहे. त्यामुळे खोतकर यांनी दिलेलं निमंत्रण पंकजा मुंडे स्वीकारणार का ? हा येणारा काळच ठरवणार आहे.