दुनिया की कोई भी ताकत मुझे रोक नहीं सकती : राहुल गांधी

36

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेने देश हादरला आहे. हाथरस येथील पीडितेचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाल्याने देशातून संताप व्यक्त केला जात आहे. देशभरातून उत्तर प्रदेश सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. उत्तर प्रदेशात सध्या तणावाचं वातावरण आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह पीडितेच्या घरी भेट देण्यासाठी हाथरस गाठले. तेंव्हा तिथे मोठा गदारोळ माजला होता कार्यकर्ते व पोलीस यांच्यात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी शांतता राखण्यासाठी राहुल गांधी यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पण, राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यावर ठाम होते. ते पायीच पीडितेच्या घराकडे निघाले. त्यावेळी त्यांची अडवणूक करत यूपी पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली. तसेच ते माघार घेत नसल्यानं त्यांना पोलिसांनी अटक केली होती.

आता पुन्हा एकदा गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस खासदारांचं एक प्रतिनिधिमंडळ शनिवारी दुपारी हाथरस घटनेत पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्वीट केलंय. त्यांनी पुन्हा हाथरसला जाणार असल्याची माहिती दिली आहे. ‘जगातील कोणतीच शक्ती मला हाथरसच्या दुःखी कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही.’ असं ट्वीट त्यांनी केलं आहे.