दोन फुले…

38

एवढा मोठा जगाचा पसारा. त्यात किती जीव नी किती काय काय. हवा, पाणी, दगड धोंडे, डोंगर, वस्त्या, झाडं, वाहने, जनावरे आणि अजून बरच काही. हे सगळे माणसाच्या जगण्याचा भागच आहेत. म्हणून या जगात माणसांची वर्दळ पण तितकीच जास्त. कोणाला कुणाचाही थांगपत्ता नाही. जो तो आपआपल्या विवंचनेत लिप्त असतो. किंवा बेहोशीत मग्न असतो. ही बेहोशी कसली, बरी की वाईट हे ज्याच त्यालाच माहीत.

प्रत्येकाची वेगळी अशी दूनिया आहे. त्यातच आपल्या दोघांच ही एक अनोखं विश्व आहे. इथे केवळ तू आणि मी असे दोघेच असतो. जगात राहूनही जगापासून कोसो मैल दूर. तू सोबत असताना मला दूसऱ्या जगात वावरायची आवश्यकताच नसते. माझं जग फक्त तूच असतेस. आणि तूझं मी. तूझ्या समोरच्या कित्येक अडचणी. सततची दगदग आणि अशांतता मला नेहमीच जाणवत असते. या धकाधकीत ही तूझ्या शांततेच्या हक्काच एक ठरलेलं ठिकाण आहे. सखे, ते तूला चांगलच ठाऊक आहे. जिथे येऊन तूला अख्ख्या जगाचा विसर पडतो. तिथे तू तू राहतच नाहीस मुळी. तूझ्यातल्या ती ला तिलांजली मिळून केवळ आपण उरतो. दोन देह एक मन होऊन जातो. असंही मी तूला सतत फूलाची उपमा देत असतो. आणि ते खरच आहे. तूझ्यातलं कोमल मन फूला पेक्षा वेगळं नाहीच. माझ्या सहवासात तुझं फूलणं पाहण्या सारखं दूसर सुख नसतं. बऱ्याचदा तुझ्या मनीचे गूज नकळतपणे माझ्या ओठी अवतरते. आणि आपण वेड्यागत हसू लागतो.

मनांची इतकी एकरूपता क्वचितच पहायला मिळते. आपण त्याचे मुर्तीमंत साक्षीदार होतो. काही फूलांना विशिष्ट गंधकोष असतात ना तसे तुझे श्वास आहेत. तूझ्या श्वासांची सुगंधित लय मला भारून टाकते. तूझ्या पर्यंत यायला प्रवृत्त करते. कित्येक गोष्टी आहेत ज्या मला थांबूच देत नाहीत. आणि अर्थातच, मला थांबायच ही नसत. इतक्या धकाधकीत तू भेटल्यावर माझ्या अगणित समस्यांचे काटे मखमालीत रूपांतरित होतात. तूझं भेटणं कधीही एकट नसत. तू सोबत येताना गंधीत फुलांची वर्दळ घेऊन येतेस. आणि मला, हे फुल प्रचंड खूप आवडत. एकमेकांना सुगंधीत करण्यासाठी दोन फुले एकत्र येतात. फुलांचे सहवास घडून आले की बहरण्याचा काळ सुरू होतो. हा बहरण्याचा काळ साधता आल्यावर जगायच कस हा प्रश्न उरतोच कुठे. सोबत रहायचं आणि सुगंध पेरायचे. यापेक्षा वेगळं जग नसावं.

गौतम कदम, मंबई