नांदेड : ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार द्या भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांची मागणी

100

देगलूर (सिकंदर शेख)
मागील महिनाभरापासून सतत पडलेल्या पावसामुळे मूग, उडीद तर गेलेच होते. आता सोयाबीन काढणीच्या वेळी तरी पावसाने विश्रांती घ्यावी अशी प्रार्थना शेतकरी करीत होता पण मागील पंधरा दिवसापासून वरुणराजाने धो-धो बरसत शेतीचे अतोनात नुकसान केले असल्याने सोयाबीन काळवंडून गेले आहे. त्याकरिता शेतकरी आता अस्मानी संकटांची लढा देत आहे. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा व तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

देगलूर तालुक्यासह मरखेल गटात यावर्षीच्या मृग नक्षत्राच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्याने कोरोनाच्या संकटाशी सामना करीत पेरणी केली होती. मात्र पीक काढणीला आले तेंव्हा अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर व ज्वारी या पिकांचे १००% नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तर लवकरात लवकर पंचनामे न केल्यास सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाउपाध्यक्ष शिवराज पाटील माळेगावकर, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, जिल्हा चिटणीस शिवकुमार देवाडे, तालुकाध्यक्ष शिवाजीराव कनकंटे, तालुका सरचिटणीस मालिकार्जुन पाटील, अशोक डुकरे, तालुकाउपाध्यक्ष बालाजी पाटील थोटवाडीकर, कैलास वंटे, देगलूर शहराध्यक्ष अशोक कांबळे, बाजार समितीचे माजी सभापती रमेश पाटील हाळीकर, सोशल मीडिया सहसंयोजक संजीव पांचाळ यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकारी व करकर्ते उपस्थित होते.