देगलूर (एस. आय. शेख) :
देगलूर तालुक्यात मागील आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील पीक मातीमोल केले. तर ठिकठिकाणी रस्ते खचून रस्त्यावरील पूल वाहून गेले आहेत. या पावसामुळे मरखेल- वळग रस्त्यावरील पूल वाहून गेला असून, या रस्त्यावरील वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी लागली आहे. या रस्त्यावरील पूल दुरुस्त करून वाहतूक पूर्ववत करावी अशी मागणी माहिती सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष बालाजी लंगोटे वळगकर, तालुकाध्यक्ष प्रल्हाद नाईकवाडे यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग देगलूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सततच्या पावसामुळे मरखेल- वळग रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने वळग, आमदापूर, व शेजारील मुखेड तालुक्याला जाणाऱ्या प्रवाशांना अडचण ठरत आहे. याशिवाय या भागातील बऱ्याच रस्त्यावरील पूल वाहून व खचून गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र याकडे कानाडोळा करीत आहे. मरखेल येथे मोठी बाजारपेठ, शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालयांसाठी वळग व आमदापूर याठिकाणच्या लोकांना मरखेलला यावे लागते. मात्र रस्त्यावरील पुलच वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्यावरून चालताना एखादा अपघात घडण्याची शक्यता आहे. याकरिता तात्काळ पुलाची दुरुस्ती करून, रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी केली आहे.