राज्यात परतीच्या पावसाने शेतीसह इतर मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांवर कायमच आसमानी सुलतानी संकटाची टांगती तलवार असते. सध्या मोठ्या नुकसानीला शेतकरी सामोरा जातोय. त्यामुळे अनेक नेते नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्य सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना त्यांची जीभ घसरली.
‘केंद्र सरकार हे राज्य सरकारहुन वाईट आहे. हिंदीमध्ये कवाडी म्हणतात त्याप्रमाणे पंतप्रधान आहेत. दारूडा पैसे मिळाले नाही की, पत्नीला मारतो आणि मग त्याच्या लक्षात आलं कि बायकोकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. मग तो घरातलं सगळं सामान विकतो. अन तेही संपलं की तो मग घरच विकतो. मोदी या देशातला पंतप्रधान नसून हा दारुडा आहे आणि म्हणून इथलं आख्ख विकायला निघाला आहे’ असा एकेरी उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत.