आपल्या पत्नीवर वाईट नजर ठेवणाऱ्या मित्राचा पतीने दुसऱ्या मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून खून केला. वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारात ही खळबळजनक घटना घडली. दोन दिवसांपूर्वी येथे अनोळखी मृतदेह सापडला होता. या प्रकरणाच्या तपासात ही बाब पुढे आली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ४८ तासांमध्ये दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी हिंगणघाट रस्त्यालगत सोनेगाव शिवारातील शेतात अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून विद्रुप केलेला मृतदेह आढळला होता. प्रकरणाच्या तपासादरम्यान हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शास्त्री वॉर्डातील अविनाश फुलझेले हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोनेगाव शिवारातील मृतदेह हा अविनाश फुलझेलेचा असल्याची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तपास वेगानं फिरवला.
तपासात सुधीर जवादे आणि निखील ढोबळे या दोघांनी अविनाशची दगडान ठेचून हत्या केल्याचं उघडकीस आलं. अविनाशन सुधीरच्या पत्नीवर वाईट नजर ठेवायचा, अश्लील संवाद साधायचा. यामुळे ही हत्या घडल्याचं तपासात निष्पन्न झालं. मद्य प्राशन केल्यानंतर सुधीरने निखीलच्या मदतीने अविनाशची दगडाने ठेचून हत्या केली.