पावसातला सह्याद्री; ‘त्या’ ऐतिहासिक सभेची आज वर्षपूर्ती

76

आज बरोबर एक वर्षापूर्वी साताऱ्यात ऐतिहासिक सभा पार पडली. होय मी त्याच सभेबद्दल तुम्हाला स्मरण करून देतोय. ज्या सभेत पावसातला सह्याद्री ह्या उभ्या महाराष्ट्राने पाहिला. एकीकडे आपले सगळे सवंगडी एक, एक करत परकियांच्या दावणीला बांधले जात होते; तेंव्हा एक उमदा तरुण भर पावसात जनतेला साद घालत होता. त्याच उमद्या तरुणामुळे ‘ती’ सभा गाजली, वाजली, आणि बरसली सुद्धा…

त्या उमद्या तरुणाच वेगळी ओळख सांगण्याची गरज महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या जनतेला तरी नक्कीच नाही. तरीही, थोडाफार राजशिष्टाचार म्हणुन सांगतोय ! शरद पवार म्हणजे फक्त राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणातील मौल्यवान हिरा. राजकीय उलथापालथ होवो अथवा राजकीय मुत्सदगिरी प्रत्येकाच्या तोंडावर नाव हमखास येणार ! दिल्लीच्या तख्ताला अनेकवेळा हदरायला भाग पाडणारे, गरज पडेल तेव्हा टेकू देणारे अफलातून नेते म्हणजे शरद पवार साहेब…

गोष्ट आहे एका वर्षापूर्वीची. त्याच शरद पवारांची, त्यांच्या भर पावसातल्या त्या ऐतिहासिक अविस्मरणीय सभेची. तर गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी पार्श्वभूमी समजून घेऊयात. तसा सातारा, बारामती, पुणे, सांगली इतकचं काय ! तर पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यात साताऱ्याचा विचार केला तर त्याठिकाणी शरद पवारांना मानणारा वर्ग फारच मोठा. त्याठिकाणी असलेले खासदार उदयन राजे हे हमखास राष्ट्रवादीला मोठ्या मताधिक्याने खासदारकी निवडून देत. पण त्याच उदयनराजेंनी भाजपा मध्ये प्रवेश केला. त्याचसोबत शिवेंद्रराजे भोसले हेही भाजपला मिळाले. असं करत करत साताऱ्याचे बुरुज ढासळले जाऊ लागले. पण याची तमा पवारांनी बाळगली नाही. हाच साताऱ्याचा किल्ला लढवण्यासाठी शरद पवार उभे ठाकले. समोर आपलेच म्हणवणारे आपलीच लोक उभी होती. त्याची पर्वा न करता त्यांनी १८ ऑक्टोबर २०१९ ला साताऱ्यातील जिल्हा परिषद मैदानाच्या ऐतिहासिक सभेत, साताऱ्याच्या परिणामी राज्याच्या राजकारणाचे समीकरणे बदलून टाकली. या सभेपूर्वी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा पार पडली. त्यामुळे शरद पवारांची सभा फसणार असे अंदाज राजकीय जाणकार मंडळीनी लावले. हे सगळे अंदाज त्या सभेने धसास लावले. हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय…

सभेला सुरुवात झाली आणि वरून राजाने सरी बरसवल्या, आता लोकं सभा सोडून माघारी पळतील असं वाटत असतांना, लोकं पावसात भिजत आहेत हे पाहून; आपल्या अंगावरील छत्री पवारांनी बाजुला केली. लगेच सगळी लोकं जाग्यावर स्थब्द झाली. जणू काही परतीचे दोर त्या छत्रीकरवी कापले जावेत. शरद पवार बरसले. “गतवेळी माझी चूक झाली. ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे” असे भावनिक आवाहन त्यांनी त्याठिकाणी केलं. सगळ्या जनतेने धीरगंभीर आवाजात सुरू असलेली ती सभा कानभरून ऐकली. आणि झालं घडलं त्या सभेचा मोठाच परिणाम सातारा आणि राज्याच्या राजकारणावर झाला. उदयनराजे पराभूत झालेच, त्याचबरोबर राज्यात राष्ट्रवादी नामशेष होईल अशा वावड्या उठत असतांना, मोठा विजय मिळवला. राज्यात महाविकास आघाडी नामक शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस या तीन पक्षाची आघाडी करत सत्ता स्थापनेची अशक्यप्राय गोष्ट त्यांनी करून दाखवली. हे आपल्या स्मरणात आहेच. असो, त्या ऐतिहासिक सभेने पडलेला फरक आजच्या राजकारणाच बीज ठरलं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.
रोहित गिरी, औरंगाबाद, 9604312182