पुतळे जाळा किंवा काहीही करा भूमिका बदलणार नाही – प्रकाश आंबेडकर

19

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि छत्रपती उदयनराजे समर्थकामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आरक्षण वादाचे पडसाद राज्यभर उमटत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायलयाने आरक्षणावर स्थगिती आणल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या वादात उडी घेत प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांच्या जहरी टीका केली होती. त्यामुळे उदयनराजे समर्थक आक्रमक झाले असून प्रकाश आंबेडकर यांना उदयनराजे स्टाईलने उत्तर दिले जाईल असं म्हटलं होते.

यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया आली असून माझे पुतळे जाळा किंवा काहीही करा. कारण मी फक्त तीनच राज्यांना मानतो. ते म्हणजे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज याव्यतिरिक्त मी कोणालाही राजा मानत नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्हाला आरक्षण मिळाले नाही तर इतरांचे रद्द करा, असे म्हणणे चुकीचे आहे. ही मागणी करणारा राजा बिनडोक आहे. राज्यघटना कळत नसताना त्यांना भाजपाने राज्यसभेवर कसे पाठवले, असा सवाल उपस्थित करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी नाव न घेता खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधला होता. या वक्तव्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं होतं. आता त्यालाच प्रकाश आंबेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.