प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण

1

बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांना कोरोनाची लागण झाली आहे. कुमार सानू यांचे मॅनेजर जगदीश भारद्वाज यांनी त्यांना कोरोना झाल्याची अधिकृत माहिती दिली आहे. कुमार सानू यांच्या टीमने देखील फेसबुकद्वारे चाहत्यांना याबद्द्लची माहिती दिली. बॉलीवूडमध्ये 90च्या दशकात त्यांच्या आवाजातील गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने सध्या ट्विटरवर कुमार सानू यांच्या नावाने ट्रेंड सुरू झाला आहे.

कुमार सानू हे गुरुवारी 15 ऑक्टोम्बरला सकाळी 10 वाजता दुबईच्या मार्गाने अमेरिकेतील लॉस अँजल्स शहरात जाणार होते. विमानाने प्रवास करण्यापूर्वी कोरोनाची तपासणी केली जाते. त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे अमेरिकेला जाण्याचे रद्द झाले. त्यामुळे बीएमसीने त्यांना होम क्वारंटाईन होण्यास सांगितले, अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने एका वृत्त वहिनीला दिली आहे.

येत्या 20 ऑक्टोम्बरला त्यांचा वाढदिवस असून हा दिवस कुटुंबियांसोबत घालवण्याची इच्छा होती. कुमार सानू यांच्या मुली सना आणि एना आणि त्यांची पत्नी सलोनी लॉस अँजल्स येथे राहतात. ते प्रत्येक महिन्याला त्यांना भेटायला जातात. तसेच कुमार सानू यांचा मूलगा बिग बॉस 14 मध्ये आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याचे देखील गायक होण्याचे स्वप्न आहे. शोमध्ये भाग घेण्यापूर्वी कुमार सानू यांनी आपल्या चाहत्यांना मुलाचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. कुमार सानू यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरही कोरोना झाल्याची पोस्ट केली आहे. चाहत्यांनी लवकर बरे व्हा अशी प्रार्थना देखील केली आहे.