प्रकाश आंबेडकर यांनी बिहार विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होण्याचे भाकीत वर्तवले आहे. सध्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरु आहे. केंद्र व राज्यात अराजकीय मुद्द्यांवरुन राजकारण सुरु असले तर त्यावरुन फारसा परिणाम होत नाही. सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकार आपातकालीन व्यवस्थापन कायद्यातंर्गत आदेश काढत आहे.
केंद्र सरकारने नुकत्या मंजूर केलेले कृषी विधेयक राज्यात लागू करण्यास महाविकासआघाडी सरकारने विरोध दर्शविला आहे. ही एकप्रकारची बंडखोरी आहे. भारतीय घटनेने राज्याला अशाप्रकारे बंडखोरी करण्याचा अधिकार दिलेला नाही. केंद्र सरकारने एखादा कायदा मंजूर केल्यास राज्यांना त्याचे पालन करणे बंधनकारक असते. त्यामुळे राज्य सरकारने कृषी विधेयक लागू करण्यास नकार दिल्यास कलम 356 अंतर्गत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.