बिहार निवडणूक २०२०: देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या ‘या’ राष्ट्रीय जबाबदारीची अधिकृत घोषणा

12

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केंद्रीय भाजप नेतृवाची नेहमीच कृपादृष्टी राहिली आहे. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे देवेन्द्र फडणवीस विश्वासू मानले जातात. अगदी महिन्याच्या अंतरावर येवून थांबलेल्या बिहार निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती त्या प्रमाणे फडणवीस मागच्या काही दिवसांपासून काम करत आहेत. त्यांच्या बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी नियुक्तीची आज अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

२०१४ महाराष्ट्र विधानसभेत स्वबळावर निवडणूक लढवून भाजपला सत्तेत बसवण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा होता आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना शिवसेनेच्या जोडीने ५ वर्षे यशस्वी सरकार चालवून दाखवलं. महाराष्ट्रात सर्वात मोठी ताकद असलेल्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हरवून महाराष्ट्र भाजपची ताकद वाढवली हे केंद्रीय नेतृत्व जाणून आहे. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत आले होते पण राजकीय परीस्थिती बदलल्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत.

मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशा चर्चा रंगत होत्या. पण त्यावर अजून काही स्पष्ट झेलेले नाही देवेंद्र फडणवीस यांना स्वताला महाराष्ट्राच्या राजकारणात सध्यातरी अधिकचे रस दिसत आहे पण केंद्रीय नेतृत्वाचे कोणतेही आदेश पाळण्यास ते तयार आहेत असे अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवले आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या बिहारमध्ये पुन्हा भाजप प्रणीत एनडीएची सत्ता यावी या हेतूने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे, भाजपचे एक यशस्वी माजी मुख्यमंत्री, उच्चशिक्षित, हिंदी-इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, उत्तम संघटक, राजकीय अभ्यासक, निवडणूक आणि प्रचाराच्या ‘मायक्रो मॅनेजमेंट’वर मजबूत पकड व कमालीचे हजरजबाबी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांची ‘बिहार विधानसभा निवडणूक प्रभारी’ म्हणून नियुक्ती झाल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे. राष्ट्रीय नेतृत्वाने दाखविलेला विश्वास देवेंद्र फडणवीस किती खरा उतरवतील हे पाहणे औत्सुक्याचे राहील.