नुकतेच भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी मध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यानंतर आता अजून एक आमदार शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. मीरा- भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा प्रवेश होणार आहे.
कोण आहेत गीता जैन….
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत गीता जैन यांनी अपक्ष निवडणूक लढवून भाजपच्या नरेंद्र मेहता यांना पराभूत केलं होतं. गीता जैन मीरा भाईंदरच्या महापौर असताना त्यांचे कामकाज व वादग्रस्त मुद्दे यावरून स्थानिक भाजपा नेते आणि आमदार असलेल्या नरेंद्र मेहतांशी बिनसले. नंतर गीता जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली. परंतु गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे नरेंद्र मेहता यांनाच विधानसभेच्या उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत गीता जैन यांनी भाजपामधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती आणि भाजपाचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी पुन्हा भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र, आता सत्तेचे बदलते समीकरण जुळवण्यासाठी गीता जैन शिवसेनेत प्रवेश करत असल्याची चर्चा आहे.