भाजप बहुजनांचा पक्ष नाही असं म्हणत नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ज्या भाजपला शेटजी-भटजी आणि लाटजीचा पक्ष म्हटलं जात होतं. ज्या पक्षाची ओळख फक्त मारवाडी, भटांचा पक्ष अशी होती. ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम केलं. पण या लोकांना त्याची जाण आहे का ? म्हणजे यांना अजूनही बहुजन नेतृत्व नकोच आहे. पक्षात आणि समजा पक्षात घेतला तरी मिरवायला हेच लोकं. मग इतर लोकांनी फक्त यांच्या सतरंज्या उचलायच्या का ? असा बेधडक आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे. काल शनिवारी खडसे नाशिक दौऱ्यावर असतांना त्यांनी आपल्या मनातील सल माध्यमांकडे बोलून दाखवली.
भाजपला पूर्वी मारवाडी, भट-ब्राह्मणांचा, शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळख होती. त्या वेळेपासून आम्ही सगळे काम करतोय. अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत केली आहे. त्यामुळे शेटजी-भटजीचा जो चेहरा होता तो बहुजन समाजाचा चेहरा करण्याचा प्रयत्न केला, पण यांना त्याची किमंत आहे का? असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. २०१४ नंतर मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं म्हटलं होतं. तेंव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखाली होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल, असं खडसे म्हणाले.