महात्मा गांधीजी म्हणजे स्फुर्ती

79

नागोराव सा. येवतीकर

भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले, अश्या थोर नेत्यामध्ये महात्मा गांधीजींचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे कार्य स्मरण करताना एक विशेष ऊर्जा प्राप्त होते आणि कामात उत्साह देखील निर्माण होते. इंग्रजाना विरोध करण्यासाठी बहुतांश लोकांनी शस्त्र किंवा हिंसा यांचा वापर केला. पण महात्मा गांधींजीनी असहकार आंदोलन करून अहिंसेच्या मार्गाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यासाठी त्यांनी लोकांना जागे करण्याचे काम केले. प्रत्येक कामाची सुरुवात ते स्वतःपासून करीत असत. त्यामुळे लोक त्यांच्या पाठीमागे उभे राहिले नाही तर गांधीजी जे म्हणतील ते करण्यास एका पायावर तयार राहत असत. हे त्यांच्या रोजच्या चालण्यातून आणि बोलण्यातुन स्पष्टपणे दिसून येते.

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म 02 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. त्यांनी वकीलीचे शिक्षण घेतले. वकीलीचा व्यवसाय करण्यासाठी ते दक्षिण अफ्रिकेला निघाले. त्याठिकाणी त्यांना खुप वाईट अनुभव आले. दक्षिण आफ्रिकेला जाताना रेल्वेत ही वर्णभेदाचा वाईट अनुभव आला त्यामुळे त्यांनी याविरुद्ध लढा देण्याचे ठरविले. याच ठिकाणी त्यांच्या लढा चालू झाला. कदाचित ते दक्षिण अफ्रिकेला गेले नसते आणि त्यांना वर्णद्वेषाचा अनुभव आला नसता तर भारताला महात्मा गांधीजी सारखे व्यक्ती लाभले नसते. दक्षिण आफ्रीकेतून परत येतांना त्यांनी अन्याय आणि विषमता नष्ट करण्यासाठी झगडण्याचा निश्चय केला होता.

सन 1920 पर्यंत भारतीय स्वातंत्र्यलढाचे नेतृत्व लोकमान्य टिळक यांच्याकडे होते. मात्र 01 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि देशाचे नेतृत्व महात्मा गांधीजी यांच्याकडे आले. गांधीजी भारतात आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी संपूर्ण भारतभ्रमण करून सर्व परिस्थितिचा आढावा घेतला. माणसाने माणसांना माणुसकीनेच वागवावे हेच सूत्र सर्वांना समजावणे आवश्यक आहे असे त्यांचे मत बनले. समाजात असलेली गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर, मालक-मजूर, स्त्री-पुरुष यांच्या मधली दरी कमी करण्याचे काम प्रथम करण्याचे ठरविले. त्याचबरोबर इंग्रजांच्या जुलमी धोरणांना विरोध करण्यासाठी अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार यांचा वापर करण्याचा त्यांनी निश्चय केला.

जोपर्यंत देशातील प्रत्येक जनतेला अंगभर कपडा मिळणार नाही तोपर्यंत एक पंचा, एक उपरणे, साध्या चपला अशा वेशात राहण्याचा त्यांनी संकल्प केला आणि त्याचा त्यांनी अवलंब ही केला. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तिनुसार त्यांचे वागणे होते त्यामुळे गांधीजी जनतेला आपला आदर्श नेता वाटू लागले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले गांधीजी लोकांच्या भल्यासाठी साधे पंचा नेसून राहू लागले. इंग्रज सरकार आपल्या मालाची विक्री व्हावी म्हणून भारतीयांना त्यांनी विदेशी मालाचे प्रलोभन दाखवून लुबाडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. स्वदेशी मालाचा वापर करण्यात यावा म्हणून त्यांनी स्वदेशीचा वापर करण्याविषयी लोकांना आवाहन केले तेंव्हा देशात लोकांनी विदेशी वस्तूची होळी केली. बाबू गेनू नावाच्या क्रांतीकारकानी परदेशी वस्तु वाहून नेणाऱ्या ट्रक समोर स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले.

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी देशातील सर्व लोकांना एकत्र आणण्याचे काम केले. हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणल्यास एकजूट राहिल हे ते ओळखून होते, त्या दिशेने ते कार्य केले. अनेक वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी आपल्या भाषण, लेखन आणि प्रार्थनासभामधून लोकांना जागे करण्याचे काम केले. देशातील लोक त्यांच्या हाकेला ओ देत इंग्रज सरकारच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या बोलण्यात एक शक्ती होती हे जेंव्हा इंग्रजाना कळले त्यावेळी ते गांधीजीना देशातील महत्वाचे व्यक्ती ठरविले. इंग्रज सरकारला कसल्याच प्रकारचे सहकार्य करायचे नाही असे त्यांनी जाहिर केले अन पाहता पाहता देशभर असहकार आंदोलन चळवळ जोर धरु लागली. इंग्रजांच्या अनेक कामाला त्यांचा विरोध होता. जसे की, भारतातल्या मिठावर लादलेल्या कराविरुद्ध 1930 ची दांडीयात्रा असो चंपारण्यातील शेतकऱ्याच्या अन्यायाविरुद्धचा लढा. अलाहाबादच्या गिरणी कामगारांसाठी केलेले उपोषण असो हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्यासाठी केलेले 21 दिवसांचे उपोषण इ. उदाहरणातुन त्यांचे कार्य ठळकपणे जाणवते. आत्ता इंग्रजाना भारतात रहाणे अवघड आहे असे कळल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला स्वतंत्र करण्यात येईल असे ठरविण्यात आले. त्यानुसार आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढा मध्ये महात्मा गांधीजीचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. त्यांनी सर्वाना सत्य आणि अहिंसेचा मंत्र दिला ज्याच्या बळावर आपण गुलामगिरीतून मुक्त झालो. आज त्यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.