महाराष्ट्रात आजही निवडणूक झाली, तरी भाजप स्वबळावर सत्तेत येईल : जे.पी. नड्डा

24

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासासाठी घेतलेले सर्वच निर्णय फायद्याचे आहेत. या निर्णयाविरोधात राजकीय हेतूने अपप्रचार केला जात आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन जनतेला करून उत्तर दिले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष  जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी भाजपा प्रदेश कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना केले.

महाराष्ट्रात आज सरकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आहे. सत्ताधारी पक्षात समन्वय नसल्याने कारभाराचा धुव्वा उडाला आहे. राज्य सरकारचे अपयश कार्यकर्त्यांनी जनतेसमोर दाखवले पाहिजे. महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपाला जनादेश दिला होता. मात्र भाजपाचा नव्हे तर जनमताचा विश्वासघात करून हे सरकार सत्तेत आले आहे. आता महाराष्ट्रात निवडणुका झाल्या तर भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वासही नड्डा यांनी व्यक्त केला.

कोरोनाच्या काळात देशातील आरोग्य यंत्रणेची स्थिती लक्षात घेता, नरेंद्र मोदी यांना योग्य ते निर्णय घेऊन कोरोना च्या प्रसाराला अटकाव केला. पाश्चात्य राष्ट्रांनी वर्तविलेले अंदाज खोटे ठरवले. भारताने केलेल्या उपाययोजनांची आता मोठ्या देशांकडून प्रशंसा होत आहे. लॉकडाऊन काळात जाहीर केलेल्या आत्मनिर्भर पॅकेजद्वारे उद्योगपती , शेतकरी अशा समाजातील सर्वच वर्गांना बऱ्याच योजनांचा लाभ दिला आहे. या योजनांची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी सामान्य जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे. मोदी सरकारने देशाच्या संरक्षणाशी कोणतीही तडजोड केली नाही . त्यामुळे गेल्या ६ वर्षांत चीनच्या सीमेवर रस्ते , पूल यांची कमी वेळेत उभारणी केली. आता भारत कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे.

या वेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक , विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, संजय धोत्रे, पक्षाचे राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. भाजपा प्रदेश कार्यसमिती बैठकीला मार्गदर्शन करताना नड्डा बोलत होते.