शिवसेनेचा दसरा मेळावा झाल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रावर एकहाती भगवा फडकवायचा आहे. शिवसैनकांनी सज्ज व्हा, असे उद्धव ठाकरेंनी आवाहन केले आहे. काल रात्री 10 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. शिवसेनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात येईल, निधी उपलब्ध करण्यास अडचणी येतील, परंतु त्यावर आपण मात करू असं बैठकीत उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा प्रदेश नाही, हे वाघचं राज्य आहे. जो महाराष्ट्राच्या हिताच्या आडवा येईल त्याला आडवा पाडून गुढी उभी करणार असा इशारा उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून दिला होता. दसरा मेळाव्यात भाजपवर त्यांनी जोरदार टीका केल्या होत्या.
मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मिटिंग केली. या चर्चेमध्ये ठाकरेंनी राज्यात एकहाती भगवा फडकवणार असून, त्यासाठी शिवसैनकांनी तयार राहावे असे सांगितले. आता विरोधी पक्षाला हे कितपत रुचेल याबाबत महाराष्ट्रात चर्चा सुरू आहेत.