मुंबईत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला महिला मारहाण करत असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये महिला कारवाई केल्याचा रागातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करत असल्याचं दिसत होतं. महिला मारहाण करत असताना पोलीस कर्मचारी मात्र संयम बाळगून होता. समोर महिला असल्याने त्यांनी तिला कोणत्याही प्रकारे रोखण्याचा प्रयत्न केला नाही. त्या महिलेचा सन्मान ठेवत तिला प्रतिउत्तर दिलं नाही. त्यामुळे त्यांचं मोठं कौतुक पोलीस दलात होत आहे. एकनाथ पारठे मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर कार्यरत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या संयमाबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे. एकनाथ श्रीरंग पारठे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. एकनाथ पारठे यांनी केल्लाय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला असून १० हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.