जीवनपथावर चालताना नक्की काय घडेल याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही. खरंतर तो न लावलेलाच बरा. अथांग असलेल्या सागराचा ज्याप्रमाणे थांग लागत नाही त्या प्रमाणे त्याच्या पोटात नक्की काय दडलेले असेल सांगू शकतं का कोणी..? तसंच तुमचं आमचं जीवन. एखाद्याच्या जीवनाचा थांग असा सहजपणे लावता येत नाही आणि तो लावूच नये. भावनिक बंधानी जोडलेलं असतं जीवन. भावनांशी खेळणारे जसे भेटतात तसे भावना जपणारेही भेटताच. फक्त त्या व्यक्तीला ओळखण्यासाठी आपल्याला उशीर होतो इतकंच.
तुम्ही विचार कराल की अरे कालपर्यंत तरी बरा होता हा..! मग आज अचानक असा काय बोलतोय. पण लक्षपूर्वक वाचाल तेंव्हा कळेल की यातलं काही खोटं किंवा चुकीचं आहे तरी का..? असो प्रत्येकाचेच विचार भावना या सारख्या नसतातच. कधी कधी मला ना त्या नारळाच्या आतल्या खोबऱ्या पेक्षा त्याच्या कवटीशीच जास्त सलगी वाटते. मी असाच आहे. मला आवडतं स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करायला. आणि माझ्या याच अट्टहासा पायी मी जीवनातले कित्येक संघर्ष हारलेत. मला समजून घेणं फारच कठीण आहे. नाही नाही हे म्हणणं माझं स्वतःच नाही तर हे म्हणणं मला जन्म दिलेल्या आईचं आहे. अंशतः मला ओळखणाऱ्या सर्वच लोकांचं हेच तर मत आहे.
मी असाच आहे कितीही रमलो तरी मला पु.ल. यांचे हसरे विनोद नकोसे वाटतात. मला आवडतात ती पात्र ज्यांना समजणं लोकांना आज पर्यंत जमलं नाही. हॅम्लेट, देवदत्त, कर्ण, संभाजी ही पात्र नियतीच्या चक्रव्यूहात अडकून कायम उपेक्षित राहिली तीच जवळची वाटतात. कुसुमाग्रज यांनी लिहिलेल्या नटसम्राट मधील आप्पासाहेब बेलवलकर या पेक्षा त्यांच्या पत्नी कावेरी हे पात्र अधिक मनाला भिडणारं ठरतं. अगदी जगाच्या अंतापर्यंत कृष्णा बरोबर तिचं नाव जोडल्या गेलंय पण तरीही ती त्याला मिळवू शकली नाही त्या राधेची व्यथा ही अगदी तशीच. एकट्याच्या जीवावर ज्याने संपूर्ण युद्ध जिंकलं असतं त्या अश्वस्थामाला सुद्धा म्हणावं असे श्रय मिळाले का हो.? नाहीच ना.. अगदी र. वा. दिघे यांनी लिहिलेल्या सराई कादंबरी मधील लाडीचं मरण ही अपरिहार्य ठरावं. अशी कित्येक पात्र आहेत या जगाच्या पाठीवर त्यातीलच मी सुद्धा एक.
मी असाच आहे बंडखोर, थोडासा हेकेखोर, स्वतंत्र विचारप्रणाली असलेला विक्षिप्त……
–निलेश कुं. जाधव