राज्य सरकारने महावितरणमधील उपकेद्र सहायक पदासाठी परीक्षा घेतली होती. ऑगस्ट 2019 मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा 28 जून 2020 रोजी निकालही लागला. मात्र, अद्याप नियुक्ती न मिळाल्याने सचिन चव्हाण यांनी घरीच मुंडन करुन ऊर्जामंत्र्यांच्या नावाने निषेध व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलेल्या एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे.इंजिनिअर सचिन चव्हाण यांनी आपले मुंडण करुन राज्य सरकारचा निषेध नोंदवला आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यातील सचिन चव्हाण यांनी इलेक्ट्रीकल्स विषयात आयटीआय पूर्ण केला. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवीही घेतली. मात्र, सरकारी नोकरी असल्याने महावितरणमधील जाहिरात पाहून आयटीआय पात्रतेवरुन असलेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी अर्ज भरला. परीक्षा दिली, निकाल लागला, निकालाच्या यादीतून निवडही झाली.
आता 2 वर्षे होत येतील परीक्षा पास होऊन, पण राज्य सरकारला आमचं काहीच पडलं नाही, आम्ही पूर्णपणे हतबल झालो आहोत, अशा शब्दात सचिन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.