पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मोदी हात उंचावून अभिवादन करताना दिसत आहेत. यावरूनच पंतप्रधान मोदी यांना ट्रोलदेखील केलं जात आहे. त्याचं झालं असं, नुकतच मोदी यांनी अटल टनलचे उद्गाटन केले. हिमाचल प्रदेशमध्ये बांधण्यात आलेला हा एक बोगदा असून यामुळे लेह ते मनाली हे अंतर कमी होणार आहे.
पंतप्रधान मोदींबरोबरच या सोहळ्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सुद्धा उपस्थित होते. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित राहलेल्या पंतप्रधान मोदींच्या एका कृतीवरुन सध्या सोशल नेटवर्किंगवर जोरदार चर्चा सुरु आहे. मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडणाऱ्या या ९.०२ कि.मी. लांबीच्या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी हे रिकाम्या बोगद्यामध्ये कोणीही नसताना कोणाला हात उंचावून दाखवत होते असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
पीर पांजाल पर्वतराजीत ३ हजार मीटर म्हणजे १० हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधणी करण्यात आलेल्या या बोगद्याचे उद्घाटन करण्यासाठी पोहचलेले पंतप्रधान बोगद्यामधून जाताना हात उंचावून अभिवादन करत होते. मात्र बोगद्यामध्ये कोणीच नव्हते तर मोदी नक्की कोणाला हात करत होते असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. हा प्रश्न उपस्थित करणारे अनेक ट्विट फोटो आणि व्हिडिओंसहीत पोस्ट करण्यात आले आहेत.