मोदी सरकारला दिलासा! 8 महिन्यानंतर 1 लाख कोटींहून अधिक जीएसटी वसूल

15

कोरोनाचे संकट रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्चमध्ये देशात लॉकडाऊनची घोषणा केली. याचा तोटा देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला होता. टप्याटप्याने काही गोष्टी अनलॉक करण्यात आल्या आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद असल्याने केंद्राला मिळणाऱ्या महसुलात घट झाली होती. मात्र आता सरकारला याबाबत दिलासा मिळाला आहे.

2020 या वर्षात प्रथमच ऑक्टोम्बरमध्ये 1 लाख कोटींपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून प्रथमच जीएसटी संकलन एक लाख कोटींच्या पुढे गेले आहे. अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून मिळाली आहे. हळूहळू अर्थव्यवस्था पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून जीएसटी कलेक्शन देखील वाढले आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोम्बरच्या जीएसटी कलेक्शनचे 9 हजार 745 कोटींनी वाढ झाली आहे तर ऑक्टोम्बरचे जीएसटी कलेक्शन 1 लाख 5 हजार 155 कोटी इतके आहे. ज्यात सीजीएसटी 19,193 कोटी रुपये, एसजीएसटी 25,411 कोटी रुपये आणि उपकर 8,011 कोटी रुपये समावेश आहे.

31ऑक्टोम्बरपर्यंत दाखल झालेल्या GSTR-3B रिटर्न्स एकूण संख्या सुमारे 80 लाखांपर्यत पोहोचली आहे. गेल्या ऑक्टोम्बरच्या तुलनेत यंदा जीएसटी 10 टक्क्यांनी वाढला आहे. देशांतर्गत व्यवहारांचा विचार केल्यास या आघाडीवर महसूल 11 टक्क्यांनी वाढला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तुलनेत अनुक्रमे -14 टक्के, -८ टक्के, आणि 5 टक्के एवढी आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत आहे.