टीम वर्तमान | राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करणे या अनुषंगाने ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात राज्यातील ३९५ शहरे आणि ३३९ मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उत्कृष्ट काम करणारी ३ अमृत शहरे, ३ महापालिका, ३ नगरपंचायती आणि ३ ग्रामपंचायतींना ५ जून या जागतिक पर्यावरण दिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी केली.
अभियानात राज्यात उत्कृष्ट काम करणारे विभागीय आयुक्त, ३ जिल्हाधिकारी आणि ३ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आज महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री श्री. ठाकरे यांनी मंत्रालयातून अभियानाचा ई-शुभारंभ केला. ३१ मार्चपर्यंत अभियानाचा कालावधी असेल.
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर हे कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी ऑनलाईन सहभागी झाले होते.