राज्यशासनाच्या सहभागातून, गणिताच्या गोडीसाठी पाढे पाठांतर स्पर्धा

12

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ नोव्हेंबर, २०२० रोजी राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन मराठी भाषा व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली झूम मीटिंगद्वारे दि.३ नोव्हेंबर, २०२० रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन होणार आहे.

मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली. मराठी परंपरा संवर्धनाचा विषय असल्याने महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेने सह आयोजक या नात्याने या स्पर्धा आयोजनात सहभाग घेतला आहे. मंदार नामजोशी म्हणाले,’ पाढे पाठांतर स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून पाठ होतात. त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे. त्यासाठी अंकनादतर्फे पाढे पाठांतर स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले आहे. जिल्हा पातळी, विभाग पातळी व राज्य पातळीवर स्पर्धा घेतली जाईल. ही स्पर्धा मराठी भाषेतून घेण्यात येणार असली तरी सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर स्पर्धा खुली आहे. पाढे पाठांतर स्पर्धा महाराष्ट्रातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यासाठी आहे.