राज्यसेवा पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबरलाच म्हणजे ठरलेल्या तारखेलाच होणार असल्याचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज स्पष्ट केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसारच ही परीक्षा घेणार असल्याचं आयोगाने म्हटलंय.
राज्यात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. सोबतच धनगर समाज देखील एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरतांना पाहायला मिळतोय.
मराठा क्रांती मोर्चाच्या नेते आणि खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली होती. तसेच अन्य वेगवेगळ्या संघटनांनी यासंदर्भात आवाज उठवला होता. त्यामुळे परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रमाचे वातावर निर्माण झालं होतं. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज आपली भूमिका जाहीर केल्याने हा संभ्रम दूर झाला आहे.